"भाविक-वाहनचालकांसाठी धोका! वाल्मिकी पूल रस्त्यावर खड्ड्यांचा कहर"


 पंढरपूर : चंद्रभागा नदीवरील महर्षी वाल्मिकी पूल रस्ता खड्ड्यांनी झालाय धोकादायक! नागरिकांचा जीव मुठीत


पंढरपूर शहरातील महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा चंद्रभागा नदीवरील महर्षी वाल्मिकी पूल हा नागरिकांसाठी आज मृत्यूचा सापळा ठरत आहे. 

या पुलावरुन जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


दररोज हजारो दोनचाकी, चारचाकी वाहने आणि मालवाहतूक गाड्या या रस्त्यावरून जातात. परंतु, रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. 

पावसाळ्यानंतर खड्ड्यांची परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. 

काही खड्डे एवढे खोल झाले आहेत की, त्यात चाकच अडकून जाते, त्यामुळे अपघात होऊन गंभीर जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.


नागरिकांचे म्हणणे काय?

स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, "हा रस्ता शहराचा जीव आहे. भाविक, पर्यटक, व्यापारी, शेतकरी सगळे याच मार्गाने येतात. 

पण आता हा रस्ता खड्ड्यांचा मार्ग झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर मोठी दुर्घटना घडणार हे नक्की."


भाविकांसाठी मोठा धोका

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे रोज हजारो भाविक येतात. महर्षी वाल्मिकी पूल हा प्रमुख मार्ग असल्याने खड्ड्यांमुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

अनेक जण गाडीवरून पडत आहेत, महिलांना आणि ज्येष्ठांना प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

प्रशासनाचे मौन चिंताजनक

स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाला तसेच संबंधित विभागाला लेखी तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पंढरपूर नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, असा आरोप होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या