राज्यातील 30 लाख कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सोलापूर येथे 1348 सदनिकांचे वितरण करण्यात आले.
नवभारताचा पाया रचणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेने सुंदर गृहनिर्माण प्रकल्प उभारला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समस्या सोडवतानाच सामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांना अत्यंत कमी दरात घरे मिळाली आहेत. लाभार्थ्याला घरभाड्याएवढाच बँकेचा हप्ता भरावा लागणार असून, घर त्याच्या नावावर होणार आहे, असे नियोजन करण्यात आले आहे. सदर 1348 सदनिकांपैकी दहिटणे येथील 1128 सदनिकांची निर्मिती राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच शेळगी येथील 220 सदनिकांची निर्मिती श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था यांच्या माध्य्मातून करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरमध्ये 48,000 घरांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 25,000 घरांचे काम पूर्ण झाले असून, 20,000 घरे नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत आणि उर्वरित घरांचे काम सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹1000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 30 लाख घरकुलांना मान्यता दिली आहे. सध्या 20 लाखांहून अधिक घरांचे काम सुरू असून पुढील 2 वर्षांत सर्व 30 लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. सोलापूरमध्ये उभारलेली आकर्षक व कमी खर्चातील घरे ही 'सोलापूर पॅटर्न' म्हणून राज्यभरात मार्गदर्शक ठरत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारले गेले तर युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा निश्चित केल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारले जाईल आणि इथे आयटी उद्योगांना आकर्षित करण्यात येईल. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात येत आहे. सांडपाणी प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निकाली काढला असून, ते काम सुरू झाले आहे. शहरातील जलवितरण वाहिनीच्या ₹850 कोटींच्या प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या निधीच्या धनादेशांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून राज्यात 1,52,000 उद्योजक घडले असून, ₹13,000 कोटींचा निधी याकरिता राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामुळे रोजगार देणारा उद्योजक घडविण्यात यश आल्याचे समाधान असल्याचेही, मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या