स्टेटस ठेवणाऱ्यांवर कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात.

 


गुंडगिरीचे स्टेटस ठेवत असाल तर सावधान! पोलिसांची होणार ‘कडक' कारवाई’

पंढरपूर शहरात अलीकडच्या काळात गुंडगिरी दाखवणारे स्टेटस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही तरुण गुंडगिरी, धमक्या, शस्त्रांचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत आहेत. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. पंढरपूर पोलिस ठाण्याकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, सोशल मीडियावर गुंडगिरीचे, शस्त्रांचे किंवा धमकीचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई फक्त कायदेशीरच नव्हे तर अशा व्यक्तींना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांसमोर जाब विचारला जाणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुंडगिरीचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. तसेच, अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. यामध्ये शस्त्रासह फोटो काढणारे, तलवारी किंवा पिस्तूल दाखवून व्हिडिओ बनवणारे आणि त्यातून दहशत निर्माण करणारे लोक थेट पोलिसांच्या रडारवर असतील.


पंढरपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या गुंडगिरीच्या कृत्यांना प्रोत्साहन देऊ नका आणि समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करा. गुंडगिरीचा दिखावा करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत पोलिस ठाम असून, “गुन्हेगारीला शून्य सहनशीलता” ही भूमिका त्यांनी घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या