Rain News: पावसाचा कहर; नांदेडमध्ये आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव, 260 घरांची पडझड, 200 हून अधिक जनावरे दगावली

 

Nanded Rain Updates: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळपास 970 गावे बाधित झाली असून 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेड: मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गोदावरी, आसना, पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक गावातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. 14 ते 18 ऑगस्टपर्यंत या पाच दिवसात जिल्ह्यातील 970 गावं अस्मानी संकटाने बाधित झाली आहेत. शिवाय जिल्ह्यातील 3 लाख 24 हजार 234 शेतकऱ्यांचे दोन लाख 59 हजार 789 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात सोयाबीन, मूग, उडीद, हळद यासह अन्य पिकांचा समावेश आहे.


पावसाचा कहर सुरू असताना आतापर्यंत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत अंगावर पडल्याने शेख हसीना बेगम शेख नसेर आणि शेख नसेर शेख अमिन यांचा मृत्यू झाला. तसेच किनवट तालुक्यातील बोधडीमध्ये नाल्याच्या पुरात शाळेची बस वाहून गेल्याने चालक प्रेमसिंग पवार यांचा मृत्यू झाला आहे. तर मुखेड तालुक्यातील हसणाळ येथील भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले यांचा पुराच्या पाण्यात अडकून मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या