Beed Rain : बीडला पावसाचा तडाखा! अनेक गावांना पुराने वेढले, शेती पूर्णत: पाण्याखाली; अस्मानी संकटापुढे बळीराजा हतबल

 

Beed Rain : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला बुरशी लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक नद्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. मांजरा नदीच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरू असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यातील नदी नाल्यां सह तलाव भरगच्च भरले आहेत नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीन सह अन्य शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, परळी, वडवणी, गेवराई, अंबाजोगाईसह अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर, नांदडी व सोमनाथ बोरगावच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेवराईतील काळेगाव परिसरात जोरदार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप आले आहे. याच ठिकाणच्या एका तरुण शेतकर्‍याच्या सोयाबीनच्या शेतात कमरेएवढे पाणी साचले आहे. या पाण्यात उभं राहून या शेतकर्‍याने आमदार विजयसिंह पंडित यांना मदतीची विनंती केली आहे.

अस्मानी संकटाच्या कचाट्यात शेती

बीड जिल्ह्यातील अनेक मंडळांना पावसाने झोडपले. मागच्या पाच दिवसांपासून सततच्या होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी राजा आता अस्मानी संकटात सापडला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या