अमेरिकेत पहिल्यांदाच ‘मांस खाणाऱ्या परजीवी’चा प्रादुर्भाव; सीडीसीने केली पुष्टी
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी (24 ऑगस्ट) मानवामध्ये न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म या धोकादायक परजीवीचे पहिले प्रकरण नोंदवल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. या मांस खाणाऱ्या परजीवीमुळे मानवाच्या शरीरातील जखमांमध्ये अळ्या निर्माण होतात आणि त्या जिवंत मास खातात.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या सार्वजनिक आरोग्य संस्थेने 4 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची पुष्टी केली होती. परजीवी आढळलेला रुग्ण अल-साल्वाडोरहून अमेरिकेत परतला होता, असे समजते. अल-साल्वाडोर हा देश अजूनही या परजीवीच्या प्रादुर्भावाखाली आहे.
काय आहे न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म?
न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म हा एक घातक परजीवी आहे, जो प्रामुख्याने जखमांमध्ये राहतो आणि मास खातो. याच्या अळ्या माशांच्या अंड्यांपासून तयार होतात आणि त्या त्वचेतल्या जिवंत ऊतींवर उपजीविका करतात. वेळेत उपचार न केल्यास संसर्ग गंभीर होऊ शकतो आणि मृत्यूचा धोका निर्माण होतो.
रुग्णाची स्थिती व आरोग्य विभागाचा इशारा
CDCच्या माहितीनुसार, रुग्णावर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचा आणि प्रवासानंतर तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, लक्षणांमध्ये जखमेभोवती सूज, तीव्र वेदना, खाज आणि पुळी दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या